नाशिक —(दिपक पवार)–—-आमदार सत्यजीत तांबे यांची नाशिक जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर कोलंज, मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल यांच्यासह नाशिक जिल्हा परिषद कार्यालय येथे नुकतीच एक नियोजित बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत नाशिक जिल्हा अग्रेसर ठरायला हवा,या दृष्टीकोनातून पुढील कार्यवाही सुरु करण्याचे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागाला केले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांना एकत्रितपणे काम करावे लागेल असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. जिल्ह्यातील प्रशासकीय कामांना गती देण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पात्र मुख्याध्यापक, पदवीधर व केंद्रप्रमुख यांना पदोन्नती द्यावे. तसेच कायमस्वरूपी कंपल्सरी व्हॅकन्सी बंद करून त्यांच्या रिक्त पदांसह इतर सर्व पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के अभावीतपणे भरण्यात यावे. सोबतच वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची पदे मान्य करून चटोपाध्यय लागू करण्यात यावे, वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव लवकरात लवकर मागविण्यात यावे आणि आगाऊ वेतनवाढीसाठी मंजूर शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ लागू करावी. अश्या अनेक महत्वाच्या मागण्या आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण अधिकारी भास्कर कोलंज यांच्याकडे केल्या आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक फरक, वैद्यकीय देयके व सेवानिवृत्त शिक्षकांचे देयके निधीअभावी प्रलंबित आहेत. या सर्व देयकांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात तातडीने वर्ग करण्यात यावी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळच्या वेळी देण्यात यावे. सोबतच निवडश्रेणी प्रस्ताव आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा गट विमा लवकरात लवकर मंजूर व्हावा व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे देयके लवकर मंजूर व्हावे आणि मार्च २०२३ मध्ये बचत गटाने शालेय पोषण आहारासाठी पुरविलेल्या तेलाची रक्कम अदा व्हावी. यांसारख्या अनेक महत्वाच्या सूचना आमदार सत्यजीत तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सोबतच आजच्या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थांच्या कपातीबाबत चर्चा झाली. अवघड व सोपे क्षेत्र निश्चीतीबाबत झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणातून अवघड क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबतदेखील यावेळी विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
नाशिक जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये मंजूर शिक्षक संख्येपेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या कमी आहे. तसेच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना प्रभारी चार्ज देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कामाच्या वाढत्या व्यापातून शिक्षकांपुढे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, डी सी पी एस धारक प्राथमिक शिक्षकांना विविध प्रश्न उद्भवले आहेत. हे सर्व प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षक संघटनांसोबत तीन महिन्यांतून एकदा एक संयुक्त बैठक आयोजित करून त्याचे इतिवृत्त द्यावे व ऐनवेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यावे अशी संकल्पना आमदार सत्यजीत तांबे यांनी आजच्या बैठकीत मांडली आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांना सेवापुस्तक, गोपनीय अहवाल व सेवानिवृत्ती (पेन्शन) यांसारख्या प्रशासकीय कामांत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत असून त्यासाठी मोठा विलंब सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाचे निकाल असूनही शिक्षण विभागाकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ केली जात आहे. शिक्षकांना उद्भवणाऱ्या यांसारख्या अनेक समस्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातून जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
नाशिक जिल्हा परिषद कार्यालय येथे पार पडलेल्या आजच्या बैठकीत प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर कोलंज, मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल यांच्यासह मुख्य लेखाधिकारी महेश बच्छाव, जगदाळे, उप शिक्षण अधिकारी धनंजय कोळी, कार्यालयीन अधीक्षक दराडे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले व विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.