……!अखेर शाळा व्यवस्थापन समितीच्या पाठपुराव्याने; लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी ; ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजू
लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी–-येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळा ही जीर्ण व धोकेदायक झाल्याने शासनाच्या आदेशानुसार गेल्या२ वर्षांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली होती.त्यामुळे शाळेला एकही वर्गखोली नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने मा. ना.मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,पालकमंत्री , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यासह वरिष्ठांना वारंवार निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन १०वर्गखोल्यांची मागणी केली होती.व त्याचा सतत पाठपुरावा केला अन त्याची दखल घेत जळगांव जिल्हा परिषदेने “जिल्हा परिषद मोठी बांधकामे “या योजनेअंतर्गत लोहारा शाळेला ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार दीपक पवार व समिती सदस्य तसेच पालकवर्ग यांनी जिल्हा परिषदेचे विशेष आभार मानले आहेत.
येथील ६० वर्षे जुनी असलेली जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक असल्याने शासनाच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन शासनाने शाळेची नवीन इमारत बांधकाम करणेसाठी मुलभूत सुविधा २५-१५ या योजनेंतर्गत शासन निर्णय क्र.विकास–२०१९/प्र.क्र.१८०/भाग-९/योजना-६ दि.२० सप्टेंबर २०१९च्या आदेशानुसार ६० लाखांचा निधी मंजूर केला होता.मात्र राज्यात सत्ताबदल होताच विद्यमान शासनाने मुलभूत सुविधा २५-१५च्या मंजूर सर्व कामांना क्र.विकास -२०१९/प्र.क्र.२२१/यो/-६ग्रामविकास व पंचायत राज विभाग,मुंबईदि.४ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार स्थगिती दिल्याने लोहारा शाळेला मंजूर ६० लाखांच्या निधीलाही स्थगिती मिळाल्याने जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य अधांतरी झाले होते.
त्यामुळे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना लोहारा शाळेच्या बांधकामाचा प्रश्न सोडवण्यासाठी २२ फेब्रुवारी२०२० रोजी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी निवेदन दिलेले होते. त्यांनी ३१ मार्च २०२०नंतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले होते.मात्र कुठलेही हालचाल झाली नाही.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना २ नोव्हेंबर २०२० रोजी शाळेची वस्तुस्थिती मांडून तात्काळ १० वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी केली होती.त्यावर त्यांनी तात्काळ चौकशी करून वर्गखोल्या देण्याचे आश्वासन दिले होते .मात्र तरीही काहीही हालचाल होत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी लोकशाही दिनानिमित्त १ फेब्रुवारी२०२१ रोजी पुनश्च लोहारा शाळेच्या बांधकाम संदर्भात तक्रार केली. व त्याची दखल जिल्हाधिकारी राऊत यांनी घेत शिक्षणाधिकारी, जळगाव यांना लोहारा शाळेसाठी किती वर्गखोल्यांची आवश्यकता आहे?तसेच प्रशासकीय मान्यता घेऊन निधीची मागणी करावी,असे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र महितीस्तव दीपक पवार यांनाही प्राप्त झाले आहे.
या सर्व पाठपुराव्याने जिल्हा परिषदेने लोहारा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून लोहारा शाळेसाठी “मोठी बांधकामे या योजनेतून”तात्काळ ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने ‘उशिरा का होईना’लोहारा शाळेचा प्रश्न मार्गी लागून शाळा व्यवस्थापन समितीच्या लढ्याला यश मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया— लोहारा शाळेचा प्रश्न जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन पाटील ,शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जळगांव भा. शि. अकलाडे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी गंभीरतेने घेत त्यांनी तात्काळ किमान ५ वर्गखोल्यांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.तसेच उर्वरित ५ खोल्यांसाठीही लवकरच निधी मंजूर करावा.शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, डॉ .केयुर चौधरी व सर्व समिती सदस्यांचे विशेष सहकार्य मिळाले. पुनःश्च सर्व अधिकारी वर्गाचे सर्व पालक व ग्रामस्थांतर्फे आभार मानतो.
दिपक पवार पत्रकार तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जि. प.मराठी मुलांची केंद्र शाळा ,लोहारा