- लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी—येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच गावांत हल्ली डेंग्यू, सर्दी,ताप,खोकला यांचे रुग्ण आढळून येत आहे . याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील यांनी गंभीरपणे घेतलेले नसून डेंग्यू सगळ्या महाराष्ट्रातच असून अपुरे कर्मचारी व आशा स्वयंसेविका संपावर असल्याने रुग्णांची माहिती उपलब्ध नसल्याने आपण काय करणार असे बेताल वक्तव्य पत्रकारांकडे व्यक्त केले आहे.डेंग्यू च्या रुग्णांना मदत,जनजागृती व पथक न नेमता जबाबदारी झटकून देण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १७ गावांचा समावेश असून वैद्यकीय अधिकारी डॉ.शेखर पाटील यांच्याकडे पदभार आहे.मात्र त्यांनी तब्बल१५ दिवसांनी आरोग्य केंद्रात हजेरी दिली. येथील आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्पुरत्या १-२दिवसांसाठी बोलावून ओपीडी केली जात असल्याचे समजले.तर बऱ्याचदा दुपारी १२ वाजेपर्यंत ओपीडी केली जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहे.त्यामुळे पदभार असलेला निवासी वैद्यकीय अधिकारी दररोज येत नसल्याने कर्मचारी वर्गांवर कुठलेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते.त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण आढळून ही आरोग्य केंद्राकडून कुठलीच जनजागृती,कार्यवाही होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.लोहारा गावासाठी नेमण्यात आलेले आरोग्यसेवक,आरोग्यसेविका अनेक दिवसांपासून गावांत फिरकलेच नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आशा स्वयंसेविकांचा संप ; आरोग्य यंत्रणा हतबल
हल्ली १८ ऑक्टोबर पासून आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.डेंग्यूची उपाययोजना, जनजागृती व आरोग्य कर्मचारी यांची इतर बहुतांश कामे करणाऱ्या आशा संपावर असल्याने आरोग्य कर्मचारी ही हतबल झाले आहेत.त्यामुळे शासनाने तात्काळ आशा स्वयंसेविका यांच्या मागण्या मान्य कराव्यात,अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत चे दुर्लक्ष
गावांत डेंग्यू, सर्दी, खोकला ,ताप चे रुग्ण आढळून येत आहेत मात्र अद्यापही ग्रामपंचायत कडून गावांत धूळ फवारणी, उपाययोजना ,जनजागृती होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.तात्काळ धूळ फवारणी करावी,अशी मागणी होत आहे.